भोसरी- एका महिलेने सोन्याच्या झुमका चोरल्याचा खोटा आरोप सहन न झाल्यामुळे एका तरुणाने इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना २७ जुलै रोजी भोसरी येथील डेस्टिनेशन क्षितिज सोसायटीमध्ये घडली.
विनोद पेमाराम चौधरी (२६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विनोदचे वडील पेमाराम लसाराम चौधरी (वय ५८) यांच्या तक्रारीवरून भोसरी पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोदच्या किराणा मालाच्या दुकानात सोन्याचा झुमका पडल्याचा संशय संबंधित महिलेला होता. यावरून तिने विनोदवर चोरीचा खोटा आरोप लावला. तिने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन आधी ८५ हजार रुपये आणि नंतर एकूण १ लाख रुपये विनोदकडून उकळले. त्यानंतरही दुसऱ्या एका व्यक्तीला सोबत आणून आणखी ५५ हजार रुपयांची मागणी करत त्याला धमकावले.
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून विनोद याने २७ जुलै रोजी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. चोरीचा आरोप, पैशांची मागणी आणि मानसिक त्रासाला कंटाळून विनोद याने आत्महत्या केली का याचा तपास पोलीस करत आहेत.
