पुणे – पुण्यात गांजा विक्री आणि दहशत माजविणाऱ्या टोळीच्या विरुद्ध कोंढवा पोलिसांनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण बसेल असे बोलले जात आहे.
या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख रियाज अय्याज शेख (वय ३०) याच्यासह यास्मीन करीम शेख, आमिर समीर शेख, साबीया रियाज शेख आणि शमा उर्फ जोहराबी मुस्ताक शेख या ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही टोळी पुण्याच्या कोंढवा आणि स्वारगेट परिसरात बेकायदेशीर गांजा विक्री करायची आणि या भागात विनयभंग, गंभीर दुखापत, दहशत निर्माण करायची. आरोपींवर यापूर्वी प्रतिबंधत्मक कारवाई करूनही या टोळीने गुन्हेगारी सुरूच ठेवली होती. या टोळीच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने हा कठोर कायदा लावण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान पुणे शहर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी आणि सराईत गुन्हेगारी विरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
