ब्रेकिंग न्यूज

व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळ्यांची सोनसाखळी लुटली, पुणे जिल्ह्यातील घटना

Share

जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्या गळ्यातील ११ लाख रुपये किमतीच्या २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या लुटण्यात आल्या. ही घटना बुधवारी (दि. ५)रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील गावडेवाडी- शिरसवाडी रस्त्यावर घडली.

या घटनेत संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५० रा. गावडेवाडी – शिरसवाडी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं ?

संतोष गावडे हे आपले कार्यालय बंद करून मर्सिडीज कारने घरी चालले असताना रस्त्यात एका व्यक्तीने दुचाकी बंद पडल्याचा बहाणा करून त्यांची कार अडवली. त्याचवेळी इतर दोघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी कारला घेरले. एका हल्लेखोराने थेट कारच्या दिशेने गोळीबार केला. गोळी कारची काच फोडून संतोष गावडे यांच्या चेहऱ्याला लागली. ते जखमी झाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या गळ्यातील २२ तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या साखळ्या बळजबरीने हिसकावून नेल्या आणि दुचाकीवरून पळ काढला.

जखमी संतोष गावडे यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.