ब्रेकिंग न्यूज

मिसिंग लिंक परिसराचे फोटो काढायला गेला आणि धाडस अंगाशी आले 

Share

लोणावळा- सध्या सर्वाना बोरघाटातील मिसिंग लिंक मार्गाची भुरळ पडली आहे. प्रत्येकजण या रस्त्यावर आला की रील्स, व्हिडिओ बनवताना दिसतो. हरियाणा मधील एका इसमाला देखील असा मोह झाला आणि घडले भलतेच.

मिसिंग लिंक आणि परिसराच्या निसर्ग सौंदर्याचे फोटो काढण्यासाठी मोहित स्वरूप भटनागर (वय- ५९, सध्या रा. वांद्रे, मुंबई, मूळ रा. गुरुग्राम, हरियाणा) हे आपल्या आलिशान कारमधून (एमएच -०४/एफआर-७१४३) गेले. त्यांनी खंडाळा घाटातून मार्ग काढत थेट गारमाळ परिसर गाठला. यावेळी त्याने कार गारमाळ रस्त्यावर उभी करण्याऐवजी ती येथील उंच डोंगर टेकड्या व दऱ्यातील तीव्र उतारावरून धोकादायकरित्या नेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट मिसिंग लिंक बोगद्याच्या वर असलेल्या उंच डोंगरावरील दरीत सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती कार दरीतील एका मोठ्या झाडाला अडकल्याने अनर्थ टळला. अन्यथा ही कार थेट मिसिंग लिंकच्या मार्गावर कोसळून मोठी दुर्घटना घडली असती.

घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे आणि संतोष गुजरवार आणि गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. दरीत उतरणे धोकादायक असतानाही पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.

सुदैवाने या दुर्घटनेत मोहित भटनागर यांचा जीव वाचला. त्यामुळे पर्यटकांनी अनाठायी धाडस करून आपला जीव धोक्यात घालू नये.