पुणे- पुणे विमानतळावरून आता अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू होणार आहेत. पुणे विमानतळावरील दैनंदिन उड्डाण्णांची कमाल मर्यादा 220 वरून 235 पर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
विमानतळावरील गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेऊन मोहोळ यांनी 19 मार्च 2025 रोजी भारतीय हवाई दलाकडे स्लॉट वाढवण्याची अधिकृत मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश मिळाले.
सध्या इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, अकासा एअर, स्पाइसजेट, फ्लाय91, स्टार एअर आणि अलायन्स एअर या 8 विमान कंपन्या पुण्यातून सेवा देत आहेत. वाढीव स्लॉटची माहिती सर्व कंपन्यांना देण्यात आली असून त्यांच्या मुख्यालयांसोबत समन्वय साधून पुण्यातून नवीन शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची आणि सध्याच्या मार्गांवरील फ्लाइट्सची संख्या वाढवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे, असे मोहोळ म्हणाले.
भारतीय हवाई दलाच्या सहकार्यामुळे मिळालेल्या अतिरिक्त स्लॉटचा पूर्ण क्षमतेने वापर केला जाणार आहे. इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेसने दुबई आणि बँकॉक मार्गावरील सेवा पुन्हा सुरू केल्यामुळे वाढीव स्लॉटचा वापरही लक्षणीय वाढला असल्याचे त्यांनी सांगितले.
____
