मुंबई- मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अन्न सुरक्षा नियामक एफएसएसआयने ओल्ड मॉन्क, अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की आणि बॅगपायपर डिलक्स व्हिस्की यांसारख्या अनेक सुप्रसिद्ध मद्य ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मद्यामध्ये नैसर्गिक प्रक्रियेला बगल देऊन कृत्रिम फ्लेवर्स मिसळल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत उघड झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
गेल्या काही दिवसांपासून बाजारात ओल्ड मॉन्क व्हिस्कीचा तुटवडा जाणवत होता, मात्र आता FSSAI च्या या कठोर निर्णयामुळे या मद्यांच्या उपलब्धतेवर पूर्णपणे गदा आली आहे. FSSAI ने मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेची अचानक तपासणी केली होती. या पाहणीत डायजिओ इंडियाची उपकंपनी ‘युनायटेड स्पिरिट्स’, ‘इनब्रू बेवरेजेस’ आणि ‘मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर’ या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गंभीर गैरप्रकार आढळून आले.
मानकांनुसार मद्याला चव व सुवास देण्यासाठी नैसर्गिक परिपक्वता आवश्यक असते. मात्र, प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीमध्ये तपासात रममध्ये कृत्रिम रम फ्लेवर आणि विस्कीमध्ये कृत्रिम विस्की फ्लेवर बाह्य घटकांपासून मिसळल्याचे स्पष्ट झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे मद्यात वरून थेट फ्लेवर टाकण्याची कोणतीही मान्यताप्राप्त पद्धत नाही, ज्यामुळे ही उत्पादने निकृष्ट ठरवली गेली आहेत.
बंदी घातलेले प्रमुख ब्रँड्स आणि उत्पादक
ओल्ड मॉन्क (Old Monk – ३ प्रकार)- महाराष्ट्रातील खोपोली येथील ‘मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर’ प्लांटमधील उत्पादन
अँटिक्विटी ब्लू व रॉयल चॅलेंज-मध्य प्रदेश व बारामती येथील ‘युनायटेड स्पिरिट्स’ (डियाजिओ इंडिया) प्लांटमधील उत्पादन
बॅगपायपर डिलक्स आणि ओल्ड कास्क रम- मध्य प्रदेशातील ‘इनब्रू बेवरेजेस’ प्लांटमधील उत्पादन
मॅकडोवेल्स नंबर १ रम- बारामती येथील युनायटेड स्पिरिट्सचे उत्पादन
