ब्रेकिंग न्यूज

‘फटाका सायलेंसर’चा फटका ; पोलिसांकडून १८ तरुणांची धिंड आणि उठाबशा

Share

पुणे- मध्यरात्री ‘फटाका सायलेंसर’ लावून धुमाकूळ घालणाऱ्या बुलेट गँगविरुद्ध पुणे पोलिसांनी अत्यंत कडक मोहीम उघडली आहे. या प्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल करून हुल्लडबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या बुलेटसह एकूण ११ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३१ जुलै २०२६ च्या मध्यरात्री ते १ ऑगस्ट २०२६ च्या पहाटेच्या दरम्यान उंड्री, महंमदवाडी, कडनगर चौक आणि न्याती चौक परिसरात काही हुल्लडबाज तरुणांनी बुलेटच्या मॉडिफाईड सायलेंसरमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत रिल्स बनवले आणि दहशत माजवली होती. या त्रासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.

या प्रकरणी १८ जणांवर गुन्हे दाखल करून नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांची रस्त्यावरच धिंड काढत पोलिसांनी त्यांना जागेवरच उठाबशा काढायला लावल्या. तसेच बेकायदेशीरपणे सायलेंसर मॉडिफाय करून देणाऱ्या ३ गॅरेज चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांची गॅरेज सील करण्यात आली. जप्त करण्यात आलेले सर्व कर्णकर्कश आवाज करणारे बेकायदेशीर सायलेंसर पोलिसांनी काढून ते रोड रोलरखाली चिरडून पूर्णपणे नष्ट केले.

ही धडक कारवाई पुणे पोलिसांचे परिमंडळ ६ चे उपायुक्त जीवन बेनीवाल आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केली. शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि सायलेन्सर बदलून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या अशा बुलेट राजांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा देण्यात आला आहे.