खोपोली- येथील के पी धबधब्यावर वर्षा सहलीसाठी मित्रांबरोबर आलेल्या तरुणाला सेल्फी काढण्याचा मोह त्याच्या जीवावर बेतला. सेल्फी काढत असताना खडकावरून पाय घसरून धबधब्याच्या दरीमध्ये पडून मृत्युमुखी पडला.
अभिषेक कुशवाह (वय 23, रा. ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २) सायंकाळी ठाण्याहून चार मित्र रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळ असलेल्या ‘केपी वॉटरफॉल’ येथे पर्यटनासाठी आले होते. पावसाचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर सर्वजण परत निघाले. परतण्याच्या मार्गावर असताना, अभिषेक कुशवाह याला निसर्गरम्य वातावरणात सेल्फी बनवण्याचा मोह झाला. पावसामुळे परिसरातील रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात अभिषेकचा अचानक पाय घसरला आणि तो थेट 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळला.
त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी झेनिथ ठाकूरवाडी येथे जाऊन स्थानिक ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. खोपोली पोलीस आणि ‘हेल्प फाउंडेशन’च्या मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री १ वाजेपर्यंत अभिषेकच्या शोध घेण्यात आला. मात्र अंधार आणि पाऊस यामुळे शोधमोहिमेत अडथळा येत होता. सोमवारी पहाटे ४ वाजता पुन्हा शोध घेण्यात आला. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अभिषेकच्या मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले.
केवळ एका फोटो किंवा व्हिडिओसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे.
