ब्रेकिंग न्यूज

शिरूरमध्ये एकाच रात्रीत चोरट्यांचा साडेसात लाखांवर डल्ला; खाद्यतेलाचे ८० डबे पळवले

Share

शिरूर – शिरूरमध्ये एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेत चोरट्यानी तब्बल सहा लाखांचा ऐवज चोरून नेला. यामध्ये खाद्यतेलाचे ८० डबे चोरट्यानी पळवून नेले.

पहिल्या घटनेत मलठण (माळवस्ती) येथील शेतकरी दत्ता चंदर वाव्हळ (वय ३५) यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी केली. घरातील कपाटाचे लॉकर फोडून बोरमाळ, पानपोत, दोन मंगळसूत्र, नथ, कर्णफुले, लहान मुलाची अंगठी, सोन्याचे मणी असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याचवेळी शेजारी शरद किसन गायकवाड यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील २ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली.

दुसऱ्या घटनेत बाबुरावनगर येथील स्वप्नील सूर्यकांत सुराणा (वय ४४) यांच्या श्रेयांक्ष ट्रेडिंग कंपनीसमोरील अशोक लेलँड टेम्पोमध्ये ठेवलेले ४० डबे सोयाबीन तेल आणि ४० डबे सूर्यफूल तेल, असे एकूण ८० डबे चोरट्यांनी टेम्पोचे लॉक तोडून चोरून नेले. तेलाची एकूण किंमत १ लाख ८४ हजार रुपये आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एकाच रात्री घडलेल्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.