ब्रेकिंग न्यूज

भाडेकराराशिवाय राहणाऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम ; ४१ घरमालकांवर कारवाई 

Share

पुणे – भाडेकरार न करता किंवा पोलिसांना पूर्वकल्पना दिल्याशिवाय भाडेतत्त्वावर राहणारे भाडेकरू आणि घर भाड्याने देणारे घरमालक यांच्याविरोधात शहर पोलिसांच्या विशेष शाखेने कठोर कारवाई सुरू केली आहे. 

शहरात शिक्षण, नोकरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर परराज्य तसेच राज्याच्या विविध भागातून नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येतात. या ठिकाणी ते भाडेतत्त्वावर, पीजी किंवा कॉट बेसिसवर राहतात. अशा व्यक्तींपैकी अनेकजणांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आल्याने भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदविणे अनिवार्य केले आहे.

पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत २१ ते २८ जुलै कालावधीत ४१ घरमालक व भाडेकरूंवर भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई केली आहे.

सिटीझन पोर्टलवरील भाडेकरू/पेइंग गेस्ट माहिती या सुविधेद्वारे घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला ऑनलाइन देणे बंधनकारक आहे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३(३) नुसार घरमालक, इस्टेट एजंट आणि भाडेकरूंनी भाडेकरारासह पोलीस चारित्र्य पडताळणीची माहिती सादर करणे आवश्यक आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.

घर भाड्याने देताना अथवा भाड्याने घेताना आवश्यक भाडेकरार करून भाडेकरूंची माहिती तातडीने संबंधित पोलीस ठाणे किंवा सिटीझन पोर्टलवर नोंदवावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.