बारामती- लग्नाचे आमिष दाखवून एका महिला वकिलाचे लैंगिक शोषण करून, आर्थिक गैरफायदा घेणाऱ्या पोलीस हवालदाराच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश मोहन जाधव (पोलीस हवालदार, बकल क्र. ५६१, सध्या नियुक्ती – खडकी, पुणे, मूळ रा. निंभोरे, ता. करमाळा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला व्यवसायाने वकील असून सन २०२४ मध्ये न्यायालयीन कामकाजादरम्यान आरोपीची तिच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू झाल्या. आरोपी रमेश जाधव याने स्वतःचे पहिले वैवाहिक जीवन संपुष्टात आले असून पत्नीपासून अनेक वर्षांपासून विभक्त राहत असल्याचे सांगून फिर्यादी महिलेला लग्नाचे आश्वास दिले.
भावनिक शब्दांद्वारे आरोपीने तिचा विश्वास संपादन केला. आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगून आरोपी जाधव याने पीडितेकडून ४० हजार रुपये घेतले. त्याच दिवशी आरोपीने फिर्यादीला बारामती येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे पुन्हा विवाहाचे आश्वासन देऊन तिची फसवणूक करत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात फिर्यादीच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातील साखळी मंगळसूत्र म्हणून घालून ‘तू माझी कायदेशीर पत्नी आहेस’ असे सांगितले. त्यानंतर काही काळ तिच्यासोबत राहिल्यानंतर फिर्यादी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक अथवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट तिच्यावर संशय घेऊन तिला त्रास देऊ लागल्याचे फिर्यादी महिलेचे म्हणणे आहे.
दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीला मुलगी झाली. आरोपी हाच तिचा जैविक पिता असल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. मात्र मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने मुलीला स्वीकारण्यास नकार दिला अशी फिर्यादीची तक्रार आहे. बारामती शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
