शिरूर – मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच मृत्युमुखी पडला. हा अपघात रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्यावर सोनेसांगवी पठाराजवळ शुक्रवारी (ता. २९) रात्री आठ वाजता घडला. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील पिकअप चालकाला अटक केली.
दीपक राजेश थोरात (वय २२, रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे) असे या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या तरूणाचे नाव असून, त्याचे मामा वैभव शिवाजी शिंदे (रा. शिंदेवस्ती, टाकळी हाजी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी पिकअप चालक संजय सदाशिव वाळके (वय ३९, रा. माळीमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली असून, शिरूर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक थोरात हा टाकळी हाजी येथे मामा वैभव शिंदे यांच्या सलून मधेच काम करीत होता.
काल सायंकाळी रांजणगाव येथे काही वस्तू खरेदी करण्यासाठी व कौटुंबिक कामासाठी तो आपल्या दुचाकीवरून (क्र. एमएच १२ युवाय ७११२) आला होता. रांजणगावातील काम आटोपून तो रांजणगाव – सोनेसांगवी रस्त्याने टाकळी हाजी कडे जात असताना सोनेसांगवी पठाराजवळील धनगरवाडा हॉटेल नजीक विरूद्ध दिशेने भरधाव आलेल्या पिकअप जीपची (क्र. एमएच १२ झेडयु ४४१५) दुचाकीला समोरून धडक बसली. यात दीपकच्या गंभीर जखमी झाला. स्थानिकांनी त्याला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पळून जाणारी पिकअप जीप स्थानिकांनी पकडली व चालक संजय वाळके याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तो नशेत होता, असे स्थानिकांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.
