पुणे- शहरात गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजवणाऱ्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील २ फरार आरोपी आणि २ विधीसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली.
सुजित सोमनाथ धुतावळे (वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द) आणि आशिष राजू सोनवणे (वय १९ वर्षे रा. समर्थनगर हिंगणे खुर्द सिंहगड रोड) अशी आहेत. त्याचवेळी दुसऱ्या कारवाईत या गुन्ह्यातील दोन विधिसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेण्यात आले.
पर्वती पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५१/२०२६ नुसार खुनाचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने गुन्हे शाखा युनिट 2 कडून या गुन्ह्याचा तपास सुरु होता. सोमवारी (दि. 0३) रोजी युनिट २ च्या पोलीस अंमलदारांना सदर गुन्ह्यातील आरोपी हिंगणे चौक, सिंहगड आणि पद्मावती भागात आढळून आले आहेत अशी माहिती गोपनीय खबऱ्याकडून मिळाली. ही माहिती मिळताच युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी तातडीने पथकाला सदर ठिकाणी सापळा रचण्याचे आदेश दिले.
उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, संदीप शिर्के यांच्या पथकाने हिंगणे चौकात सापळा लावला. त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत ते गुन्ह्यातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
त्याचवेळी दुसऱ्या पथकाने पद्मावती परिसरातून या गुन्ह्यातील दोन विधिसंघर्षित बालकांना देखील ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चौघांनाही पर्वती पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त गुन्हे गौहर हसन आणि सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पर्वती पोलीस करत आहेत.
