पिंपरी- सातत्य, सचोटी आणि सत्यता याचा अवलंब करा, व्यसनापासून दूर रहा असे मार्गदर्शन आमदार शंकर जगताप यांनी केले. तसेच पिंपळे निलख परिसरातील पाणी, कचरा, वाहतूक या नागरी समस्या सोडवून भावी नगरसेवक सचिन साठे यांनी मागणी केल्याप्रमाणे येथे उत्तम क्रीडा संकुल लवकरच उभे करू अशी माहिती आ. जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिली.
पिंपळे निलख येथे शनिवारी (दि. १५) सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थी व विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन साठे, शिवव्याख्याते नितीन बानुगडे-पाटील, गुणवंत विद्यार्थी, विशेष सत्कारार्थी पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन व गौरव करण्याची २२ वर्षांची अखंड परंपरा जपणाऱ्या सचिन साठे सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करताना सचिन साठे यांनी सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच सामाजिक, क्रीडा, आध्यात्मिक, आरोग्य व उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचाही यावेळी गौरव होत आहे. एक चांगला सुसंस्कृत माणूस म्हणून घडवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.
यावेळी इयत्ता १० वी, १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच, सन्मानचिन्ह व स्कूल बॅग, इतर विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व स्कूल बॅग देऊन प्रोत्साहित करण्यात आले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार अमृता साठे यांनी मानले.
‘सचिन साठे स्वीकृत नगरसेवक होणार’ आमदार जगताप व शहराध्यक्ष काटे यांची ग्वाही
आ. शंकर जगताप यांनी सांगितले की, या प्रभागातील नागरिकांनी चारही नगरसेवक भाजपाचे निवडून दिले आहेत. आता पाचवा नगरसेवक म्हणून लवकरच सचिन साठे यांना संधी मिळणार आहे. पुढील वर्षीचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम नगरसेवक सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने आपण साजरा करू. आ. शंकर जगताप यांच्या या आश्वासनाला दुजोरा देत भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले की, या भागाचा पाचवा नगरसेवक सचिन साठे हेच असतील याची मी खात्री देतो असे बोलताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला.
