पवना धरणात पाण्यावर तरंगणारे सौर ऊर्जा पॅनल ; पिंपरी- चिंचवड पालिकेचा निर्णय

पवना धरणात पाण्यावर तरंगणारे सौर ऊर्जा पॅनल ; पिंपरी- चिंचवड पालिकेचा निर्णय 
Share

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने वीजखर्च कमी करण्यासाठी मावळ तालुक्यातील पवनानगर येथील पवना धरणाच्या पाण्यावर तरंगणारे (फ्लोटिंग) सौर ऊर्जा पॅनल बसवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावित योजनेमुळे वीज खर्च कमी होईल तसेच पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल. 

या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी आणि प्रास्ताविक प्रक्रियेसाठी महापालिकेच्या वतीने हालचाली सुरू आहेत. यासाठी आवश्यक निधी व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

महापालिकेने यापूर्वीच शहरातील विविध इमारतींवर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. अनेक शासकीय इमारतींवर पॅनल बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात सुका कचरा जाळून वीजनिर्मिती केली जात आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महापालिकेने वीजदेयकापोटी महावितरणला १५८ कोटी रुपये अदा केले आहेत. या पार्श्वभूमीवर पवना धरणावरील फ्लोटिंग सोलर प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालये, क्रीडासंकुले, शाळा आणि इतर इमारतींवर सौर पॅनल बसविण्यासाठी अर्थसंकल्पात ३७. १० कोटींची तरतूद आहे. या लेखाशीर्षावरील १ लाख रुपयांची तरतूद अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून वीजनिर्मिती करणे या लेखाशीर्षात वाढवण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला अधिक वेग येईल. या योजनेमुळे जमिनीची बचत होण्यासोबतच पाण्याच्या बाष्पीभवनाला आळा बसण्यास मदत होणार आहे.

महापालिकेच्या विद्युत विभागाने स्पष्ट केले की, पवना धरणावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्याबाबतचा सदस्यांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली जाईल.

Vedh News