अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेला जामीन ; पण….

मुंबई – माजी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला मुंबई स्तर न्यायालयाकडून अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. मात्र इतर प्रकरणातही सचिन वाझे आरोपी असल्याने तो तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात आधीच काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. त्यात मुंबई पोलिसातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने, रियाजुद्दीन काजी यांच्या नावाचाही समावेश आहे.
सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर सचिन वाझेला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझे आरोपी असून दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा कोर्टातील सुनावणीत जामीन मिळवण्यासाठी न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला. १ लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर सुटका करण्यात आली आहे. वाझेकडे पासपोर्ट असल्यास तो NIAकडे जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ?
२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर एक संशयित बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या २० कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. ‘अँटिलिया’ निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण १० आरोपींविरोधात अखेर ५ वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानंतर, आता सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला.






