पुणे- बहिणीशी बोलत नसल्याचा रागातून सेवानिवृत्त सैनिकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही बाब मुलाच्या लक्षात आल्यावर त्यालाही मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. केल्याचा प्रकार केल्याचे उघडकीस आले आहे.
दीपा महेंद्र दौंडकर (वय ४०, रा. संगम गार्डन, वाडा रोड, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र शिवाजी दौंडकर याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत त्यांचा मुलगा अर्थव महेंद्र दौंडकर (वय १७) याने खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थव दौंडकर हा आई दीपा व वडील महेंद्र दौंडकर यांच्यासह राहत होता. महेंद्र दौंडकर हे २०१९ मध्ये सैन्यातून सेवानिवृत्त झाले असून ते सध्या विश्रांतवाडी येथील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतात. महेंद्र दौंडकर यांच्या दोन बहिणी शोभा रोडे (रा. ऐरोली, ठाणे) व कल्पना चौधरी (रा. खारेगाव कळवा, मुंबई) या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांच्याशी पत्नी दीपा या बोलत नव्हत्या. त्यांच्याशी न बोलण्याच्या कारणावरुन वडिल नेहमी त्यांच्याशी वाद घालत होते.
३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९ वाजता अर्थव सोसायटीमधील तिसर्या मजल्यावरील मुलगा रुग्वेद पोखरकर याला भेटण्याकरिता गेला. त्याचवेळी त्याची आई सुषमा पोखरकर यांच्या मोबाईलवर रात्री साडेअकरा वाजता अर्थवच्या आईचा मिस कॉल येऊन गेला. हे समजल्यावर तो घरी आला. वडिलांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांनी अर्थव यांना आईला उठवु नकोस, ती गोळी खाऊन झोपली आहे, असे सांगितले. अर्थव बेडरुममध्ये गेला असता बेडरुमची लाईट बंद होती. बेडवरील आईच्या अंगावर पांघरूण होते.
त्याने तिच्याजवळ जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती उठली नाही. म्हणून त्याने लाईट लावून पाहिले असता तिचे तोंड काळे निळे पडले होते. तिच्या मानेवर व्रण दिसले. तेवढ्यात त्याचे वडील बेडरुममध्ये आले. त्यांनी दरवाजाची कडी आतून लावून घेतली. त्यांनी अर्थवला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अर्थव याने त्यांना ढकलून बेडरुमचा दरवाजाची कडी उघडून जोरात ओरडत तो बेडरुमच्या बाहेर हॉलमध्ये गेला.
वडिलांनी किचनमधील दोन चाकू हातामध्ये घेऊन अर्थवच्या अंगावर धावून आले. आरडा ओरडा केलास तर तुला चाकुने खुपसेन, अशी धमकी देऊन पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न करु लागले. अथर्व स्वतःची सुटका करून हॉलच्या दरवाजाची कडी उघडली असता घराच्या बाहेर मामी, आजी, आजोबा, भाऊ, मावशी आले होते. त्यांनी वडिलांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आजोबांना धक्का देऊन वडिल तेथील कठड्यावरुन उडी मारुन शेतात पळून गेले. अर्थव व इतरांनी दीपा दौंडकर यांना चांडोली सरकारी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले. महेंद्र दौंडकर पळून गेला असून खेड पोलीस तपास करीत आहेत.
