ब्रेकिंग न्यूज

दहशत माजवणारा व्हिडिओ शेअर केला, पोलिसांनी हिसका दाखवला

Share

बारामती- एका तरुणाने हातात पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन एक धमकीवजा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सुपा पोलिसांच्या नजरेस हा व्हिडिओ आल्यानंतर त्यांनी या तरुणाला आपला पोलिसी हिसका दाखवला.

प्रेम प्रताप जगताप असे व्हिडीओ शेअर केलेल्या तरुणाचे आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) आणि १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास २४ ऑगस्ट रोजी ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरील व्हिडिओ आला. बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप याने पिस्तूल सदृश्य वस्तू हातात घेऊन हा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर तसेच ‘जंगल अपना है, और कानून भी अपना है’ अशा धमकीवजा आशयाचा वापर करण्यात आला होता.

या प्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल करून या तरुणाला बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.