तळवडे मधील दरोडा प्रकरणी ८ तासात तिघांना अटक, चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पिंपरी- तळवडे येथील घरफोडी आणि दरोड्याप्रकरणी चिखली पोलिसांनी अवघ्या ८ तासांत तिन्ही आरोपींना अटक केली असून, आरोपींकडून सुमारे ५७.८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली. शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
अनारुल्लाह मजहरुल्लाह चौधरी (वय ३६, रा. चिखली), अब्दुल रहीम मजीद मोमीन (वय ३९, रा. मुंब्रा, मुंबई जवळ), समीउल्लाह अजमतुल्लाह खान (वय ३२, रा. मुंब्रा, मुंबई जवळ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलीस उपायुक्त (झोन ४) श्वेता खेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आरोपींनी कुदळवाडीतील एका भंगार गोदामावर दरोडा टाकण्याचे मूळ नियोजन केले होते. मात्र चहा पित असताना त्यांना या बंगल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी ज्येष्ठ महिलेला लक्ष्य केले. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी शहरातील ७० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, तसेच तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून मुंब्रा आणि चिखली परिसरातून तिन्ही मुख्य आरोपींना अवघ्या ८ तासांत बेड्या ठोकल्या. आरोपींकडून सुमारे ७३ तोळे सोन्याचे दागिने अंदाजे किंमत ५७.८७ लाख रुपये, चांदीच्या पैंजणांच्या तीन जोड्या, लुटमारीसाठी वापरलेली मोटारसायकल आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त केलेले सोने तक्रारदार महिलेने सांगितलेल्या ६८ तोळे सोन्याच्या दागिन्यापेक्षा जास्त आहे. हे सोने नेमके कुणाचे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान कुडाळवाडीतील एक ठिकाण सापडले, जिथे सीसीटीव्ही फुटेजमधील मागोवा संपला. त्यानंतर इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींची ओळख पटवली.
घटनेची पार्श्वभूमी
१३ ऑक्टोबर रोजी पहाटे १ ते १.१५ च्या दरम्यान तळवडे येथील ज्योतिबा नगर भागात राहणाऱ्या भारती मारुती भालेकर यांच्या घरात प्रवेश केला. त्यांनी महिलेचे हात-पाय बांधले, तोंडावर साडी टाकली, तिला मारहाण केली आणि चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तूंसह एकूण ५३.७० लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला. महिलेने पाठलाग करू नये म्हणून चोरट्यांनी जाण्यापूर्वी तिचे हात पाय बांधून ठेवले.
भालेकर यांचा मुलगा आणि सून पहिल्या मजल्यावर झोपलेले होते. सकाळी उठून बघितल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी एवढ्या ८ तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या उपायुक्त श्वेता खेडकर आणि एसीपी प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिसांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.






