ब्रेकिंग न्यूज

पिंपळवंडी बालिका हत्या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार – सुनेत्रा पवार

Share

मुंबई – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची शेतात नेऊन निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केल्याचे उघडकीस आले. या घटनेमुळे पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून तपासाचा आढावा घेतला. याप्रकरणाची अत्यंत पारदर्शक व सखोल चौकशी करून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत,अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

हे कृत्य अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारे आहे असून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास वेगाने सुरू आहे.या प्रकरणातील आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा, अशी विशेष विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

​पीडित कुटुंबाच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट करतानाच लवकरच स्वतः पिंपळवंडीतील पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.