ब्रेकिंग न्यूज

अर्धांगवायू झालेल्या मामाचा खून करुन भाच्याची गळफास घेऊन आत्महत्या

Vector illustration in HD very easy to make edits.
Share

पुणे- अर्धांगवायुचा झटका आल्याने गेले २ महिने घरात असलेल्या मामाचा त्रास असहय झाल्याने भाच्याने मामाच्या मानेवर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला व स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संदीप वामन गडदे (वय ४८, रा. शिवे वाघाव, ता. खेड) असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. तर प्रवीण कैलास कोहीनकर (वय २०, रा. आरुडे गॅरेजच्या पाठीमागे, कोहीनकरवाडी रोड, सातकरस्थळ, ता. खेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सविता कैलास कोहीनकर (वय ४६) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी नऊ ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई सविता कोहीनकर या मुलगा अभिषेक व प्रवीण कोहीनकर तसेच भाऊ संदीप वामन गडदे यांच्यासह राहतात. संदीप गडदे यांना अर्धांग वायूचा झटका आल्याने त्यांचा डावा पाय व डाव्या हाताला जीव नव्हता. त्यामुळे त्यांना चालता व उठता येत नव्हते. गेल्या २ महिन्यांपासून त्यांना फिर्यादी यांच्या घरी आणले आहे. अर्धांग वायूचा आजार झाल्याने तो अचानक झोपेतुन उठून मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत होता. त्यातून चिडचिड करुन त्यांना सर्वांना त्रास देत होता.

शनिवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी अभिषेक हा कामाला गेला. त्यांचा लहान मुलगा प्रवीण याला शोरुममध्ये नोकरी लागणार होती. त्या ठिकाणी आईचा अंगठा लागणार असल्याने तो मोटारसायकलवरुन आईला घेऊन वाकी येथे सकाळी ९ वाजता आला. प्रवीण याने एका हॉटेलजवळ आईला थांबविले. आईला विचारले की तुझे आधार कार्ड आणले का, त्यावर त्यांनी नाही म्हटले.

त्यांना तेथेच थांबवुन तो आधार कार्ड घेऊन येण्यास परत घरी गेला. २ ते ३ तास वाट पाहूनही प्रवीण न आल्याने त्या चालत चालत घरी येत होत्या. तेव्हा वाटेत अभिषेक याचा मित्र त्यांना घेण्यास आला. ते घरी आले. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने त्यांनी घराच्या खिडकीतून आत पाहिले असता प्रवीण याने बेडरुमच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच आसपासच्या लोकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात संदीप गडदे हा बेडरुममध्ये पडलेला होता. त्याच्या मानेवर व डाव्या हाताचे पंजाचे मागील बाजूस बोटावर, डोक्यात जखम होऊन रक्त येत होते. तेथेच कोयता पडलेला होता. प्रवीण याने गळफास घेतला होता. दोघांना घेऊन चांडोली रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोघेही मृत्यू पावल्याचे सांगितले. मामाच्या त्रासाला कंटाळून भाच्याने कोयत्याने वार करुन मामाचा खून केला. त्यानंतर भाच्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक अभिजित कुदळे तपास करीत आहेत.