बारामती – पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून बारामती तालुक्यातील एका पोलीस महिलेने पतीकडून होणाऱ्या कथित मानसिक गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात घडली.
संगीता राजेंद्र काळे (वय ३१, रा. करंजे, ता. बारामती) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती किरण भानुदास भोसले यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी संगीताची आई सुलोचना राजेंद्र काळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीताचे माहेर बारामती तालुक्यातील करंजे येथे, तर सासर सुपे येथे आहे. विवाहानंतर त्या पती किरण भानुदास भोसले यांच्यासमवेत डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा परिसरात राहत होत्या. पतीला पत्नी सावळी असल्याचे आवडत नसल्याने तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि त्यातून मारहाण केली जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे . तसेच घरातील वस्तूंच्या खरेदीवरून ‘जास्त पैसे का खर्च केले?’ या कारणावरूनही दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून संगीताने बेडरूममध्ये स्वतःला बंद करून घेत सिलिंग फॅनला ब्लँकेटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
