स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागणाऱ्या पत्रकाराला रंगेहात पकडले ; रहाटणी येथे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

पिंपरी- स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपये खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी एका साप्ताहिकाशी संबंधित पत्रकाराला खंडणीविरोधी पथकाने १० हजार रुपये खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले. रहाटणी येथील जगताप डेअरी चौकातील साई कॉर्नर परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अक्षय अरुण वाघमारे (वय ३५ वर्षे रा. ३८ औंध रोड, भाऊ पाटील, पाडळेवस्ती, खडकी, पुणे) असे या पत्रकाराचे नाव असून त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, ओळखपत्र आणि होंडा कंपनीची कार असा एकूण २ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटर चालक साजिद मन्सूर पेंढारी (वय २७) यांनी ९ ऑक्टोबर २०२६ रोजी खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड येथे तक्रार दिली. रहाटणी येथील ‘अर्थ स्पा सेंटर’बाबत डायल ११२ वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती देण्यात आली आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून व्यवसाय बंद पाडण्याची आणि जास्त विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीची पडताळणी केली असता, संबंधित व्यक्ती वारंवार फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून खंडणीची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. ९ ऑक्टोबर रोजी रहाटणीतील साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक येथे १० हजार रुपये स्वीकारताना अक्षय वाघमारे याला पकडण्यात आले. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड तसेच पोलीस अंमलदार अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, रमेश मावसकर, किशोर कांबळे आणि दादाभाऊ साबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.






