चिखलीत महापालिकेची मोठी कारवाई; पाच अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली येथील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण पाच अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून, सुमारे १२०० चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकाम हटविण्यात आले.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतुल पाटील यांच्या अधिपत्याखाली कारवाईची मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत उपअभियंता हेमंत घोड, बीट निरीक्षक साईनाथ देसाई, प्रफुल भोकरे, ऐश्वर्या मासाळ, सूरज माने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहा अतिक्रमण पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ५० जवान, महापालिकेचे दोन मजूर आणि १० कंत्राटी मजूर तैनात करण्यात आले होते. अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी दोन ट्रॅक्टर, दोन ब्रेकर आणि दोन जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला होता.






