‘घर आम्हाला दे, नाहीतर…’ पुण्यात वृद्ध महिलेचे घर बळकवण्याचा टोळक्याचा प्रयत्न

‘घर आम्हाला दे, नाहीतर…’ पुण्यात वृद्ध महिलेचे घर बळकवण्याचा टोळक्याचा प्रयत्न 
Share

पुणे – एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या मालकीचे रो-हाउस बळकावण्यासाठी १५ ते २० जणांच्या टोळक्याने तिच्या घरात धुमाकूळ घातला. महिलेला धमकावून तिच्याकडे ९० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव पार्क येथील साऊथ मेन रोडवर राहणाऱ्या ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेसोबत संशयित आरोपी रोहित दिलीप आचरेकर (वय ३२, रा. अमनोरा पार्क, हडपसर) याने घर भाड्याने घेण्यासाठी करार केला होता. मात्र, आरोपीने ठरलेला हा भाडेकरार अचानक मोडून टाकला. भाडेकरार मोडल्यानंतर आरोपी रोहित आचरेकर याने १५ ते २० जणांच्या टोळक्याला सोबत घेऊन थेट ज्येष्ठ महिलेच्या घरी गेला.

या टोळक्याने वृद्ध महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत प्रचंड दहशत निर्माण केली. तसेच महिलेला धमकी दिली. “ही संपूर्ण प्रॉपर्टी मला विकत द्या, किंवा जर घर परत हवे असेल तर तात्काळ ९० लाख रुपये मला द्या,” अशी धक्कादायक मागणी करत आरोपींनी थेट खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला.

वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून कोरेगाव पार्क पोलिसांनी मुख्य आरोपी रोहित आचरेकर आणि त्याच्यासोबत आलेल्या १५ ते २० अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारे बळाचा वापर करून प्रॉपर्टी बळकावणाऱ्या या रॅकेटचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

Vedh News