एमपीएससी आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवला ; पाच जणांवर गुन्हा

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोनचा वापर करून चित्रीकरण केल्याप्रकरणी पाच जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ड्रोन जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार युवराज भारत टोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर भारत खारे (रा. तुकाराम हाइट्स, तुकारामनगर, गायमुख, आंबेगाव), प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गागुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास टोळे हे एस. एम. जोशी पुलावर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आंदोलनस्थळी ड्रोन उडत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शोध घेतला असता, आंदोलनाच्या मागील बाजूस जनरेटरजवळ दिगंबर खारे हा रिमोट कंट्रोलरच्या साहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे आढळले.
ड्रोन उडविण्यासाठी आवश्यक परवाना आणि स्थानिक पोलिसांची परवानगी आहे का, अशी विचारणा केली असता, कोणतीही परवानगी नसल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच, आंदोलनातील इतरांच्या सांगण्यावरून ड्रोन आणल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतरही शास्त्री रस्त्यावर आंदोलन केल्याप्रकरणी शुक्रवारी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ड्रोनप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. विश्रामबाग पोलीस पुढील तपास करत आहेत.






