बारामती हादरले ! मध्यरात्री घरात घुसून दोन वयोवृद्ध महिलांची अज्ञात व्यक्तीकडून हत्या

बारामती – घरात झोपलेल्या दोन वयोवृद्ध महिलांची मध्यरात्री घरात घुसून अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामतीमधील शेरेवाडी येथे घडली. ही धक्कादायक घटना आज मंगळवारी पहाटे उघडकीस आली.
कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत अशी मृत महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कृष्णाबाई लडकत आणि इंदुमती लडकत दोन्ही महिला रात्री आपल्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघींचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून उपलब्ध पुरावे संकलित करण्याचं काम सुरू आहे.
या दुहेरी हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हल्ला कोणत्या पद्धतीने करण्यात आला, घरात प्रवेश कसा झाला आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात असल्याची माहिती आहे.
बारामती तालुक्यात अलीकडच्या काळात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांच्या घटना समोर येत असतानाच शेरेवाडीतील या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. त्यातच आता दोन वयोवृद्ध महिलांची हत्या झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.






