मुख्यमंत्री फडणवीसांचा रुद्रावतार ! पुण्यातील आमदार, नगरसेवकांना सज्जड दम

पुणे- पक्षाच्या जीवावर निवडून यायचे आणि स्वतःचेच बघायचे दिवस संपले आहेत. पद हवे असल्यास आधी पक्षासाठी काय काम केले, याचा हिशेब द्यावा लागेल अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आहे. बावधन येथील ‘मेरीगोल्ड’ हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी पदवीधर मतदार नोंदणीच्या मोहिमेला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादावरून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून यापुढे प्रत्येकाचे ‘रिपोर्ट कार्ड’ तयार करण्याचा इशारा दिला.
फडणवीस म्हणाले, ” ‘मी भाषण करायला आलेलो नाही. तुम्ही किती गंभीर आहात, हे सांगायला आलो आहे. तुम्ही सगळे नेते झाला आहात; पण पक्षाच्या जीवावर निवडून येता, हे विसरत आहात. प्रत्येकाला स्वतःचे पडले आहे. पक्षासाठी काम करण्यापेक्षा नेत्यांच्या पुढे पुढे करून पदे मिळविण्याचे दिवस आता संपले आहेत ” पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून केवळ ५५ हजार मतदारांची नोंदणी झाल्याचे चित्र समोर आल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यापैकी पुणे शहरातील नोंदणी अवघी २८ हजार असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दोन लाख मतदार नोंदणीचे लक्ष्य दिले होते. किमान दीड लाख मतदारांची नोंदणी होईल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षातील आकडा खूपच कमी असल्याने फडणवीस यांनी कार्यपद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले.
पक्षाच्या पाठबळावर निवडून आल्यानंतर पक्षासाठी काम करण्याची जबाबदारीही पार पाडली पाहिजे, याची जाणीव त्यांनी करून दिली. ‘तुम्ही किती मोठे आहात, याच्याशी मला काही देणेघेणे नाही. नेत्यांच्या पुढे पुढे केले, त्यांची जी हुजुरी केली, की आपली कामे होतील आणि पदे मिळतील, असे आता चालणार नाही,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्या नगरसेवकांनी पक्षाच्या कार्यक्रमांना दांडी मारली होती, त्यांच्या भूमिकेवर फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
यापुढील काळात आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ‘गृहमंत्री म्हणूनही आणि माझी स्वतःची यंत्रणा लावूनही सर्वांचे रिपोर्ट कार्ड तयार करणार आहे,’ असा सूचक इशारा त्यांनी दिला. कोकणात जर ८० टक्के मतदान होऊ शकते, तर पुणे शहरात तितके मतदान का होऊ शकत नाही? असा सवाल करत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले.






