‘पीएसआय’ होताच पतीने दिली प्रेमाला तिलांजली ; ४० लाखाच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ, पुण्यातील घटना

‘पीएसआय’ होताच पतीने दिली प्रेमाला तिलांजली ; ४० लाखाच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ, पुण्यातील घटना
Share

पुणे- दोघांची एमपीएससीचा अभ्यास करताना ओळख झाली. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. वेळोवेळी तरुणीने केलेली आर्थिक, मानसिक मदत हे सर्व विसरून पोलीस उपनिरीक्षक होताच तरुणाने आपले खरे स्वरूप उघड केले. लग्नानंतर हुंड्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी करून पत्नीचा छळ सुरु केला. अखेर या प्रकरणी ३१ वर्षीय पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहुल राठोड असे संबंधित पोलीस उपनिरीक्षक असलेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी राहुल शेषराव राठोड आणि नणंद राजू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि राहुल राठोड यांची २०२२ ते २०२३ या कालावधीत शनिवार पेठेतील एका अभ्यासिकेत एमपीएससीचा अभ्यास करत असताना ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले आणि दोन्ही कुटुंबांनी लग्नाला संमती दिली. पोलीस उपनिरीक्षक पदाच्या संपूर्ण कालावधीत फिर्यादीने राहुलला सर्वतोपरी मदत केली. राहुलच्या मैदानी चाचणीदरम्यान त्याला मसल टीयर झाला होता, त्यासाठी फिर्यादीने वैद्यकीय उपचारासाठी त्याला २ लाख २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती.

पीएसआय झाल्यानंतर राहुल राठोड याची गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीसाठी डीजेचा २० हजार रुपयांचा खर्च देखील राहुलच्या भावाने फिर्यादीकडून मागून घेतला होता. याच मिरवणुकीदरम्यान त्याच्या नातेवाईकांमध्ये मुलगी आपल्या जातीची नाही अशी कुजबूज सुरू झाली. त्यानंतर राहुलने फिर्यादी बरोबर संबंध कमी करण्यास सुरुवात केली.

डिसेंबर २०२४ मध्ये राहुल गावी निघून गेला आणि त्याने सोशल मीडियावरील अकाउंट्स वरून देखील फिर्यादीशी संबंध तोडले. २५ मे २०२५ रोजी त्याने फिर्यादीला फोन करून, आपले नाते संपले आहे, घरचे मुलगी बघतील तिच्याशी लग्न करणार आहे. हुंडा किती घ्यायचा हेदेखील ठरले आहे. त्यामुळे आपला संबंध संपला असे सांगून कायमचा निघून गेला. मात्र गावी गेल्यानंतर देवदर्शनाला जाण्यासाठी त्याने फिर्यादीकडून २० हजार रुपये मागवून घेतले.

फिर्यादीने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी आणि लग्नाच्या आश्वासनानंतर राहुलने लग्नासाठी २५ लाख रुपये, तर त्यानंतर ४० लाख रुपये हुंडा देण्याची मागणी केली. राहुल नाशिक येथे ट्रेनिंगसाठी गेल्यानंतरही त्याचा संपर्क मर्यादित होता आणि त्याचे नातेवाईक वारंवार हुंड्याबाबत विचारणा करत असत. अखेर महिला आयोग आणि भरोसा सेलमध्ये तक्रार झाल्यानंतर, १२ सप्टेंबर २०२५ रोजी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आळंदी येथील मंगल कार्यालयात त्यांचा विवाह संपन्न झाला.

विवाहानंतरही राहुलचे वर्तन सुधारले नाही. ‘तुझ्या वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही’ असे वारंवार म्हणून तिचा अपमान करण्यात आला आणि चारचाकी गाडी आणण्यासाठी दबाव टाकला गेला. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी कार्यालयीन कामासाठी निघताना राहुलने मोबाईलमध्ये स्वतः रेकॉर्डिंग सुरू केले आणि अचानक आरडाओरड करण्यास सुरुवात केली. ‘मला मारू नको, तुला लाज वाटली पाहिजे नवरा पोलीस अधिकारी आहे, तुला जेवण बनवायला जमत नाही, नवरा कपडे बाहेर धुवायला टाकतो’ असे म्हणत तो फ्लॅटबाहेर येऊन मोठा गोंधळ घालू लागला. शेजाऱ्यांसमोर मला माझी बायको मारती आहे, तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. असे खोटेनाटे बोलून त्याने शिवीगाळ केली. या प्रकारामुळे फिर्यादी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेल्या.

पिडीत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश खांडवे करीत आहेत. पोलीस दलामध्येच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Vedh News