कोट्यवधी रुपयांचे कर्ज ६ बॅगा आणि २ पेट्यातून दिले, पेटी उघडताच….; पुण्यातील शिक्षण संस्थाचालकाची फसवणूक

कोट्यवधी रुपयांचे कर्ज ६ बॅगा आणि २ पेट्यातून दिले, पेटी उघडताच….; पुण्यातील शिक्षण संस्थाचालकाची फसवणूक
Share

पुणे – कोट्यवधी रुपयांचे कर्ज सहज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षण संस्थाचालकाची तब्बल ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. कर्जाचे चेक न वटल्यामुळे पैसे परत मागितले असता आरोपींनी ६ बॅगा आणि २ पेट्या दिल्या. या पेट्या आणि बॅगा उघडून पहिले असता जे काही दिसले ते पाहून संस्थाचालकाला धक्का बसला. त्या पेटीत रोख रक्कम नव्हती तर त्यामध्ये चक्क वृत्तपत्रांची रद्दी, विटा, चादरी आणि उशा निघाल्या. हा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.

याबाबत ‘जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सुधाकरराव उद्धवराव जाधव (वय ६५, रा. नऱ्हे) यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. ही फसवणुकीची घटना २५ डिसेंबर २०२३ ते जून २०२६ या कालावधीत घडली. या प्रकरणी अनुप दिवेकर (वय ४२), आनंद दिवेकर (वय ४४, दोघे रा. निगडी प्राधिकरण) आणि देशमुख नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सुधाकरराव जाधव यांना संस्थेच्या विस्तारासाठी मोठ्या कर्जाची गरज होती. याचाच फायदा घेत आरोपींनी जेवढे कर्ज आहे त्याच्या दहा टक्के रक्कम आधी भरावी लागले, असे सांगितले. आरोपींच्या शब्दांवर विश्वास ठेवून जाधव, त्यांच्या पत्नी आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी रोख तसेच ऑनलाईन पद्धतीने वेळोवेळी ८७ लाख ६१ हजार रुपये आरोपींच्या वैयक्तिक बँक खात्यावर आणि ‘आदेश एंटरप्रायजेस’ नावाच्या खात्यावर जमा केले.

तक्रारदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी रुपयांचे बनावट चेक दिले. मात्र हे सर्व चेक बँकेत वटलेच नाहीत. आरोपींनी तक्रारदारांना वेगवेगळ्या आलिशान कार्यालयांमध्ये नेऊन कर्ज मंजुरीची बनावट पत्रे दाखवून सतत दिशाभूल केली. जेव्हा संस्थाचालकाने आपले पैसे परत मागायला सुरुवात केली, तेव्हा आरोपींनी पैशांनी भरल्याचे भासवून सहा बॅगा आणि दोन पेट्या त्यांच्या स्वाधीन केल्या. परंतु घरी जाऊन पेट्या उघडताच त्यामध्ये विटा, जुनी वर्तमानपत्रे आणि उशा असल्याचे समोर आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संस्थाचालकाने तातडीने पोलिसांत धाव घेतली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Vedh News