मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर बाईक सापडली पण बाईकस्वार गायब , शोधकार्य सुरु

लोणावळा – मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या डोंगरमाथ्यावर एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक बेवारस स्थितीत सापडली असून, संबंधित बाईकस्वार तरुण बेपत्ता झाला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता संबंधित कर्मचाऱ्याने जीवाचे बरेवाईट करून घेतले नाही ना अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार खोपोलीजवळील गारमाळ परिसराच्या हद्दीत येणाऱ्या मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर घडला आहे
डोंगरमाथ्यावर टीव्हीएस (TVS) कंपनीची बाईक लॉक न करता तशीच उभी असल्याचे स्थानिक गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. मोटारसायकल जवळ असलेल्या बॅगेमध्ये पैशांचे पाकीट, ए टी एम कार्ड आणि मोबाइल फोन देखील सापडले आहे. राहुल सुमित मिश्रा असे या कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. काहीतरी अघटित घडल्याची शक्यता लक्षात घेऊन गावकऱ्यांनी आणि पोलीस तसेच हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तातडीने दरीत उतरून शोधकार्य सुरू केले आहे. अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही






