ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

Share

मुंबई- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतल्या बॉम्बे रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.

समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करुन अण्णा हजारेंची प्रकृती बिघडल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यांची प्रकृती आता स्थिर आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. अण्णा हजारे यांना गंभीर स्वरूपाचा संसर्ग आणि डिहायड्रेशनचा म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण प्रचंड कमी होण्याचा त्रास झाल्यानंतर त्यांना अधिक चांगल्या उपचारांसाठी तातडीने मुंबईत हलवण्यात आले आहे.

प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या टीमच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत. डॉक्टर सध्या त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करत असून, या चाचण्यांच्या अहवालानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना प्रचंड खोकला, तीव्र ताप, अशक्तपणा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे असा त्रास होत होता. प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने आणि आजारपणामुळे ते अत्यंत अशक्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणामुळे त्यांना आयसीयू नोंदवून ठेवण्यात आले आहे.