पिंपरी चिंचवड भाजपच्या ७ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवर आज होणार शिक्कामोर्तब !

पिंपरी चिंचवड भाजपच्या ७ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवर आज होणार शिक्कामोर्तब !
Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही. मात्र आज,शुक्रवारी आयोजित केलेल्या दोन तहकूब आणि एका नियमित मासिक अशा तीन सभांमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.

महापालिका निवडणुकीत भाजपने ८४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे यापूर्वीच निश्चित करून प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर सादर केली होती.

दुसरीकडे, भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांसाठी पक्षात तब्बल दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी दावा ठोकला होता. आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी स्थानिक आमदारांपासून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यातच आज शुक्रवारी होणाऱ्या तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय पहिल्या क्रमांकावर असल्याने आज स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटणार आहे.

भाजपकडून ७ स्वीकृत नगरसेवकांची संभाव्य नावे चर्चेत असून या नावांची घोषणा आज होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये होण्याची शक्यता आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सचिन साठे, जयनाथ काटे, विशाल कलाटे, भोसरी विधानसभा मतदारसंघातून ऋषिकेश म्हेत्रे व कुलदीप परांडे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राजेश पिल्ले, कुणाल लांडगे यांच्या नावांची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीकडे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vedh News