मद्याच्या होम डिलिव्हरीची जाहिरात ! पुणेकरांना पडली महागात

पुणे – मद्याच्या घरपोच (होम डिलिव्हरी) डिलिव्हरीचे आमिष दाखवून काही भामट्यांनी तब्बल १५ ते २० ग्राहकांची सुमारे एक लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून १२ नोव्हेंबरपर्यंत हा प्रकार सुरू होता. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारक आणि बनावट वेबसाइट चालवणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अर्जुन चव्हाण (वय ३५) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मद्यप्रेमींची अशी केली जात असे फसवणूक
कल्याणीनगरमधील नामांकित मद्यविक्री दुकानाच्या नावाची हुबेहूब कॉपी करून गुगलवर एक फेक पेज आणि वेबसाइट तयार केली होती. या पेजवर मद्यविक्री आणि घरपोच डिलिव्हरीची सोय उपलब्ध असल्याचे भासवण्यात आले होते. मद्य खरेदीसाठी उत्सुक असणारे ग्राहक या जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत असत. त्यानंतर आरोपी ग्राहकांना ऑनलाइन पैसे भरण्यास सांगून त्यासाठी एक क्यूआर कोड पाठवत असत. गुगलवरील पेजवर अस्सल दुकानाचे नाव आणि माहिती असल्याने ग्राहकांचा त्यावर सहजासहजी विश्वास बसत असायचा. मात्र, क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्यानंतरही ग्राहकांना कोणतीही डिलिव्हरी मिळत नव्हती. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
येरवडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, ग्राहकांनी कोणत्याही मोहात न पडता अशा कोणत्याही क्यूआर कोड किंवा नंबरवर पैसे पाठवण्याआधी सत्यतेची ग्राहकांनी पडताळणी करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






