अखेर मुहूर्त ठरला! हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे उदघाटन ३ नोव्हेंबरला

पुणे – माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनचे उद्घाटन ३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित झाले आहे. यावेळी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
मेट्रोच्या या मार्गावरील २३ पैकी १७ स्टेशन्स उद्घाटनासाठी तयार आहेत, तर ६ स्टेशनचे काम अद्याप सुरू आहे. मेट्रोची ही मार्गिका सुरू झाल्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरातून पुण्याच्या मध्यवर्ती भागात मेट्रोने प्रवास करता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन याआधी अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते. पीएमआरडीएकडून पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशीपच्या माध्यमातून ही मेट्रो मार्गिका उभारण्यात आली आहे.
हिंजवडी आणि पुणे शहराला जोडणाऱ्या या मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. या मार्गिकेवरील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे असून, प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.






