हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या उदघाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ ; मुहूर्त पुन्हा लांबणीवर

हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या उदघाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ ; मुहूर्त पुन्हा लांबणीवर 
Share

पुणे – सर्व तांत्रिक परवानग्या मिळूनही केवळ उदघाट्नसाठी पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्यामुळे उदघाटनासाठी नवा मुहूर्त शोधावा लागणार आहे. चाचणीच्या नावाखाली गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ या मार्गावर केवळ रिकाम्या फेऱ्या सुरू असल्यामुळे सर्व स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या १७ स्थानकांना सुरक्षा आयुक्तांकडून प्रवासी वाहतुकीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील दौऱ्यात या प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून आखले गेले होते. ऐन दिवाळीनंतर आयटीयन्स आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासकीय व पोलीस सूत्रांनुसार हा दौरा लांबणीवर पडल्याने नोव्हेंबरच्या सुरुवातीची अंतिम मुदतही हुकली आहे. त्यामुळे , ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत प्रत्यक्ष कधी दाखल होणार, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ने पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण करून तपासणीही करून घेतली. मात्र, प्रवाशांची वाढीव उपयुक्तता लक्षात घेऊन ती थेट शिवाजीनगर जिल्हा न्यायालयापर्यंत सुरू करण्याचा निर्णय झाला आणि उर्वरित पाच स्थानकांची मंजुरी मिळवण्यात आली. तांत्रिक पूर्तता झाल्यावर ही सेवा सुरू होईल असे वाटत असतानाच विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन लांबले गेले.

सर्व तांत्रिक आणि सुरक्षा मंजुऱ्या मंजूर झालेल्या असताना केवळ औपचारिक उद्घाटनाच्या हट्टापायी लाखो नागरिकांना सेवेपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तयार असलेल्या मार्गावर प्रवासी वाहतूक तातडीने सुरू करून, व्हीआयपींच्या वेळेनुसार औपचारिक सोहळा नंतरही पार पाडता आला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

Vedh News