पुण्यात १३ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन

पुणे – यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव १३ ते १७ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यंदा प्रथमच फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा संगीत महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे आयोजक असलेल्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी ही माहिती दिली.
साधारणपणे डिसेंबरमध्ये आयोजित केला जाणारा हा अभिजात शास्त्रीय संगीताचा महोत्सव यंदा जानेवारीत होणार आहे. यंदा प्रथमच शहराच्या मध्यवर्ती अशा शिवाजीनगर भागातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे हे ७२ वे वर्ष असून महोत्सवासंबंधीचा इतर तपशील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
हा महोत्सव शहरातील मध्यवर्ती भागात आयोजित करण्याच्या दृष्टीने आर्य संगीत प्रसारक मंडळाने फर्ग्युसन महाविद्यालयाचे मैदान मिळण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी चर्चा केली होती. सोसायटीने देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर महोत्सवाचे स्थळ निश्चित झाले. मात्र डिसेंबरमध्ये याच मैदानावर पुणे पुस्तक महोत्सवाचा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्याने ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ डिसेंबरऐवजी जानेवारीत आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचा इतिहास
या महोत्सवाची सुरुवात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी १९५३ मध्ये केली. पंडित भीमसेन जोशी यांचे संगीत गुरू, किराणा घराण्याचे थोर गायक सवाई गंधर्व (पंडित रामभाऊ कुंदगोळकर) यांच्या स्मरणार्थ हा महोत्सव सुरू करण्यात आला. हा महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळ (ASPM) द्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनानंतर, त्यांच्या स्मृतींना व योगदानाला उजाळा देण्यासाठी या महोत्सवाचे नाव बदलून ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ असे ठेवण्यात आले. या महोत्सवात गायन, वादन आणि नृत्य असे संगीताचे तीन वेगवेगळे पैलू सादर केले जातात. येथे आपली कला सादर करणे हा देशातील विविध संगीत घराण्यांच्या कलाकारांना बहुमान समजला जातो. यासाठी जगभरातील रसिक येथे येतात. या महोत्सवामुळे पुण्याच्या सांस्कृतिक वारशात भर घातली गेली आहे.






