पुण्यात किरकोळ अपघातानंतर तरुणीला ब्लॅकमेल करून ५० हजार खंडणी घेणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे- गाडीचा टायर अचानक फुटल्याने एका २१ वर्षीय तरुणीच्या कारला अपघात झाला. यानंतर दुसऱ्या कारचालकाने तरुणीला धमकी देऊन तिच्याकडून बळजबरीने तब्बल ५० हजार रुपये खंडणी वसूल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मयूर राजेंद्र रंगदळे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रस्ता) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना स्वारगेट मेट्रो स्थानकाजवळ घडली.
पीडित २१ वर्षीय तरुणी १५ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या कारने घरी जात होती. निलायम पुलाच्या अलीकडे स्वामी समर्थ मंदिरासमोर तिच्या कारचा पुढील उजव्या बाजूचा टायर अचानक फुटल्याने कारवरील तिचे नियंत्रण सुटले. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका लाल रंगाच्या कारने तिच्या कारला पाठीमागून धडक दिली. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. संबंधित कारचालकाने सुरक्षित अंतर न ठेवता वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
अपघाताच्या दुसऱ्या दिवशी (१६ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्टेशनजवळ आरोपी मयूर रंगदळे याने तरुणीला अडवून अपघाताच्या भरपाई देण्याची मागणी केली. तसेच तिचे ‘करिअर संपवून टाकण्याची’ धमकी देऊन तिच्यावर मानसिक दबाव आणला. भीतीपोटी आणि दबावाखाली येऊन तरुणीने आरोपीला जागेवरच ऑनलाइन ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, आपली फसवणूक आणि मानसिक छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपी मयूर रंगदळे विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






