टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तीन जणांना राजस्थानमधून अटक

टायगर श्रॉफवर गोळीबार करणाऱ्या तीन जणांना राजस्थानमधून अटक 
Share

मुंबई- बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी आज सोमवारी (19 ऑक्टोबर) ही कारवाई केली. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फोनवरून या अटकेला दुजोरा दिला.

आज सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या तिघांना ट्रेनमध्ये पकडले. पकडलेले तिन्ही आरोपी दिल्ली मार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. यातील दोघे आरोपी हरियाणामधील असून १ जण बिहारचा असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये एकजण अल्पवयीन आहे.

या गोळीबारमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या वतीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक सोशल मीडिया पोस्ट समोर आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जुहू परिसरातील पुष्पा पार्क येथे फुटबॉल मॅच खेळून टायगर श्रॉफ त्यांच्या कारमधून परतत असताना हा हल्ला झाला. एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात टायगर श्रॉफ यांच्या गाडीचा चालक फिरदोस आणि उमेश चव्हाण नावाचा एक पादचारी जखमी झाले आहेत.

टायगर श्रॉफ फुटबॉल मॅच खेळून बाहेर येत असताना लोक त्याची छबी टिपण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी ही घटना घडली.

Vedh News