पुण्यातील ‘त्या’ आयटी इंजिनीअरच्या आत्महत्येचे गूढ उलगडले, वडिलांनी सांगितले कारण

पुण्यातील ‘त्या’ आयटी इंजिनीअरच्या आत्महत्येचे गूढ उलगडले, वडिलांनी सांगितले कारण
Share

पुणे – पुण्यातील मगरपट्टा परिसरातील नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने खराडी येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी घडली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण समोर आले असून त्याला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यात येत होती. या मानसिक त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे.

शिखर कुमार गौरव सक्सेना (वय २२, मूळ रा. उत्तराखंड) असे मृत आयटी इंजिनीअरचे नाव आहे. खराडी येथील रिव्हरडेल सुइट्स सोसायटीमध्ये तो राहात होता. या प्रकरणी अजयकुमार भाटीया आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखरकुमार हा मूळचा उत्तराखंड येथील रहिवासी होता. पुण्यातील मगरपट्टा परिसरातील एका आय टी कंपनीत नोकरीला होता. त्याचे वडील उत्तराखंडमध्ये सरकारी नोकरी करतात. डेटिंग ॲपच्या माध्यमातून शिखरकुमार याची एका व्यक्तीची ओळख झाली होती. या व्यक्तीने त्याला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची तसेच त्याची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या त्रासाला कंटाळून मानसिक तणावामुळे त्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

शिखरच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी एका व्यक्तीने त्यांच्या पत्नीला फोन करून शिखर कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर वडिलांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला असता, फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव अजयकुमार भाटीया असल्याचे सांगितले. शिखरशी ऑनलाइन PUBG गेम खेळताना ओळख झाल्याचेही त्याने सांगितले. मात्र, शिखर PUBG खेळत नसल्याचे वडिलांनी सांगताच त्याने फोन कट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

यानंतर अजयकुमारने आपण हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर २९ मध्ये सब-इन्स्पेक्टर असल्याचे सांगितले. शिखर पुण्यात मुलींना ड्रग्ज पुरवत असल्याची तक्रार आल्याचे सांगून त्याला अटक करण्याची धमकी दिल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. दरम्यान, शिखरचा फोन बंद येत असल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास शिखरने खराडी येथील रिव्हरडेल सुइट सोसायटीच्या इमारतीवरून उडी मारली. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शिखरच्या मृत्यूनंतर त्याच्या लॅपटॉपची तपासणी केली असता, त्यावरून व्हॉट्सॲपचा वापर केल्याचे, वेगवेगळ्या खात्यांवर पैसे पाठवल्याचे आणि संबंधित व्यक्तीला पैशांच्या व्यवहारांचे स्क्रीनशॉट पाठवल्याचे आढळल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. काही संशयास्पद चॅटिंगही आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसांनी अजयकुमार भाटीया आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

Vedh News