अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा राग, दोन वर्षानंतर २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून

अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा राग, दोन वर्षानंतर २१ वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून खून
Share

लोणीकंद- दोन वर्षांपूर्वी तरुणाने एका अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. तो राग मनात ठेवून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घृण खून केला. ही घटना वढु खुर्द येथील सार्वजनिक रोडवर १४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.

विकासकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २१, रा. कोरेगाव भीमा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणीकंद पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत आकाशकुमार अनुपकुमार श्रीवास्तव (वय २३, रा. कोरेगाव भीमा) यांनी लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकासकुमार श्रीवास्तव हा वडिलांबरोबर एमआयडीसीमधील कंपनीत कामाला होता. आरोपी मुलांनी दहावीनंतर शिक्षण सोडले आहे. दोन वर्षांपूर्वी विकासकुमार याने एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र मारहाण केल्याचा त्यांच्या मनात राग होता.

चार-पाच दिवसांपूर्वी त्यांच्यात काही कारणावरुन भांडणे झाली होती. हा राग मनात धरुन या अल्पवयीन मुलाने इतर दोघा लहान मुलांना मदतीला घेऊन विकासकुमार श्रीवास्तव याला मारण्याचा कट रचला. विकासकुमार हा वढु खुर्द येथील आमदारनगर येथे सायंकाळी थांबला असताना या अल्पवयीन मुलांनी त्याला घेरले. त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर, गळ्यावर व छातीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यामुळे विकासकुमार याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना समजल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचा गुन्हा दाखल करुन मुख्य आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर तपास करीत आहेत.

Vedh News