पीएमपी बसमध्ये मायलेकाने हातचलाखी केली, पोलिसांनी काढला माग, केली अटक

पुणे- काही दिवसांपूर्वी पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सुमारे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी लंपास केल्याची घटना विमाननगर परिसरात घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे तपास करून माय लेकराला ताब्यात घेतले आहे. पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने ही कारवाई केली.
रुक्मिणी शंकर जाधव (वय ५०) आणि नितीन शंकर जाधव (वय ३५, दोघे रा. मुंढवा, पुणे) अशी माय लेकराची नावे आहेत. या माय लेकाकडून पोलिसांनी तब्बल २ लाख १८ हजार रुपयांची सोनसाखळी जप्त केली आहे.
६ ऑक्टोबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक ज्येष्ठ नागरिक पीएमपी बसने प्रवास करत होते. बसमधील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अत्यंत चलाखीने त्या ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालय आणि गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने तांत्रिक विश्लेषकाच्या आधारे तपास सुरू केला. अखेर आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या.






