तब्बल ४,६०० किमीचा प्रवास करून हरियाणा येथून तिघांना उचलले ; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई

तब्बल ४,६०० किमीचा प्रवास करून हरियाणा येथून  तिघांना उचलले ; पुणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Share

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीत चोरी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल येथून अटक केली. आरोपींचा माग काढण्यासाठी तपास पथकाने गेल्या दोन महिन्यांत गुजरात, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तब्बल चार हजार ६०० किलोमीटरचा प्रवास करून आरोपींना बेड्या ठोकल्या. 

अजय समशेर विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय, २० वर्षे, रा. समसाबाद पलवल, राज्य हरियाणा), अमन समशेर अनिल कुमार नारायणसिंग कोळी, (वय २४ वर्षे, रा. आदर्श कॉलनी पलवल राज्य हरियाणा), दिपक समशेर राजुभाई सापसिंग (वय २१ वर्षे रा. हिरानगर कॉलनी पलवल राज्य हरियाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत नऊ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी हरियाणातील पलवल येथील असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांनी तपास पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कराळे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने आरोपींच्या ठावठिकाण्याचा शोध सुरू केला. गुजरातमधील अरवली पोलिसांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलिसांनी तपासाची पुढील दिशा निश्चित केली. त्यानंतर हरियाणातील पलवल येथे जाऊन तीन संशयितांना ताब्यात घेतले.

अटक केलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी चोऱ्या केल्याचे समोर आले. अशा एकूण नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले. आरोपींकडून नऊ गुन्ह्यांतील सुमारे १३ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच सुमारे १० लाख रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी एर्टिगा मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली. असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या कारवाईसाठी गुजरातमधील अरवली आणि हरियाणातील पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले.

परिमंडळ एक ते पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी उमेश कारके सहा. पोलीस निरीक्षक, सत्यवान गेंड, मेहबुब मोकाशी, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, नितीन मुंढे, महेश कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, शशीकांत दरेकर, साहिल शेख, कैलास डुकरे, जाकीर मणियार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात, नितीन बाबर, यांनी ही कारवाई केलेली आहे

Vedh News