सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांची बाजी! सर्व २१ जागा जिंकत सिद्ध केले आपले नेतृत्व

बारामती – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचा धुव्वा उडवला.
या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध पुरुषोत्तम जगताप अशी लढत होती. जगताप यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत स्वतंत्र पॅनल उभे केले. मात्र सुनेत्रा पवार या सर्वांवर मात करून आपले नेतृत्व सिद्ध केले. या निवडणुकीत २१ पैकी २१ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत.
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, राज्यातील उच्चांकी दर देणारा कारखाना अशी याची ओळख. या कारखान्याची निवडणूक देखील तितकीच प्रतिष्ठेची आणि रंगतदार झाली. अजित पवारांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. या कारखान्याचे एकूण सभासद २७ हजार ६२५ असून त्यापैकी २३ हजार ३९३ सभासदांनी मतदान केले. या निवडणुकीत एकूण ८४. २५% मतदान झाले.
२३ हजार ३९३ पैकी राष्ट्रवादीच्या प्रत्येक उमेदवाराला १२ हजारापेक्षा जास्त मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना सरासरी अडीच हजार मते आणि पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना सरासरी साडेपाच ते सहा हजार मते मिळाली आहेत.






