……म्हणून शंभर नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस

पुणे- पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसाठी प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या सुमारे १०० नगरसेवकांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून, याचा जाब नगरसेवकांना द्यावा लागणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ नुकताच फुटला. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित होते. मात्र, अनेक नवीन नगरसेवकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे निरोप देऊनही शंभराच्यावर नगरसेवक आलेच नाहीत.
नगरसेवकांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे लक्षात आल्यानंतर सभागृहनेते गणेश बिडकर यांनी उपस्थित नगरसेवकांची नावे नोंदविण्याची सूचना केली. त्यांनी स्वतः सभागृहात फिरून कोण कोण उपस्थित आहे, याची खातरजमा केली. जे उपस्थित नव्हते, त्यांना गैरहजेरीचे कारण द्यावे लागणार आहे.






