गुटख्याच्या कारवाईची धमकी देत दुकानदाराकडून पोलिसानेच लुबाडले १.६५ लाख रुपये

पुणे – गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आणि तडजोडीनंतर किराणा दुकानदाराकडून १ लाख ६५ हजार रुपये घेतल्याचा आरोप पोलीस अंमलदारासह दोघांवर करण्यात आला आहे. उरुळी देवाची येथील या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणी प्रकाश गोकुळराम कुमावत (वय ३८, रा. दत्तनगर चौक, उरुळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस अंमलदार रामकिशन हंबर्डे आणि अन्य व्यक्ती सतीश मोरे (रा. वडकी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास दोन व्यक्ती उरुळी देवाची येथील सह्याद्री चौकातील पूजा ट्रेडर्स या किराणा दुकानात आल्या. त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगत दुकानदाराकडे गुटखा विक्रीबाबत विचारणा केली. त्यानंतर दुकानातील अतिरिक्त माल ठेवलेल्या खोलीतून विमल सुगंधी सुपारीच्या दोन गोण्या ताब्यात घेतल्या.
त्यानंतर गुटखा विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे दुकानदाराने सांगितल्यानंतर १ लाख ६५ हजार रुपयांवर तडजोड झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.






