बेकायदेशीर सीडीआर, मोबाईल लोकेशनची विक्री, २ पोलिसांसह ५ जणांना अटक ; मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई- मुंबई गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), सबस्क्रायबर डिटेल्स रेकॉर्ड्स (SDR) आणि मोबाईल लोकेशनचा डेटा पुरवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये बिहार आणि झारखंड पोलीस दलामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी २ पोलीस कर्मचाऱ्यांसहित महाराष्ट्र, झारखंड आणि बिहारमधून ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रिन्स कुमार साहनी आणि पंकज कुमार शुक्ला अशी बिहार आणि झारखंड पोलिसांतील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे एका CDR किंवा SDR साठी प्रत्येकी ४ हजार रुपये घेत असल्याचा आरोप आहे. आतापर्यंत ५० हून अधिक व्यक्तींची गोपनीय माहिती काढून ती या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार संजय उर्फ हंजला मुबारक सय्यद याच्याकडे दिल्याचा संशय आहे. त्यानंतर मुख्य सूत्रधाराने ही माहिती महागड्या दराने विकून लाखो रुपये कमावल्याचं तपासात उघड झालं आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट-१२ ला ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुप्त माहिती मिळाली होती. एक भामटा स्वतः पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून गहाळ किंवा चोरीला गेलेले मोबाईल शोधून देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत होता. या आरोपीने इन्स्टाग्रामवर जाहिरात दिली होती. त्या जाहिरातीला बळी पडलेले लोक त्याच्याशी संपर्क साधत असत. आरोपी स्वतःची ओळख “इन्स्पेक्टर संजय” अशी करून देऊन पैसे उकळायचा आणि आपल्या नेटवर्कचा वापर करून बेकायदेशीररीत्या CDR, SDR आणि लोकेशन ट्रॅक करत असे.
माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट-१२ च्या पथकाने २२ जून २०२६ रोजी जोगेश्वरी पश्चिमेकडील एस. व्ही. रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ मोबाईल जप्त करण्यात आले. मोबाईलची तपासणी केली असता, तो शासकीय सेवेत नसतानाही आपल्या संपर्कांचा गैरवापर करून फोनचे कॉल डिटेल्स आणि लोकेशन हस्तगत करत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान गुन्हे शाखेला या रॅकेटमध्ये मध्यस्थांमार्फत डेटा पुरवणाऱ्या ९ जणांच्या नेटवर्कची माहिती मिळाली. त्यापैकी ५ आरोपींना महाराष्ट्र, बिहार आणि झारखंड येथून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आरोपींनी आत्तापर्यंत तब्बल ५० कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स (CDR), ५२० पेक्षा जास्त सबस्क्रायबर डिटेल्स (SDR), ५५० हून अधिक मोबाईल क्रमांकांचे लोकेशन डिटेल्स आणि ४२० हून अधिक IMEI नंबरची माहिती बेकायदेशीरपणे मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींकडून सध्या ७ मोबाईल जप्त करण्यात आले असून, या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी हा डेटा कोणाकोणाला विकला आहे, याचा सखोल तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
इन्स्टाग्राम आणि टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोपी मुख्य सूत्रधाराच्या संपर्कात आल्याचंही तपासात समोर आलं आहे. या रॅकेटचं काम केवळ CDR आणि लोकेशन काढण्यापुरतं मर्यादित नव्हतं. तर एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवण्यापासून ते खासगी आयुष्याची माहिती मिळवण्यापर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी पैसे घेतले जात असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे






