बालेवाडीत बहुमजली इमारतीच्या २२ व्या मजल्यावर भीषण आग
बालेवाडी – बालेवाडी येथील लक्ष्मी माता मंदिराजवळ असलेल्या ‘कक्कड ला विदा या बहुमजली रहिवासी इमारतीच्या ‘बी ‘ विंग मध्ये बाविसाव्या मजल्यावर शनिवारी (ता. १०) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. आगीमुळे इमारतीतून धुराचे मोठे लोट बाहेर पडत असल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अभया नटूरे या बाहेर गेल्या असताना त्यांच्या २२ व्या मजल्यावर असलेल्या सदनिकेस अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. मजल्यावरून धूर आणि ज्वाळा बाहेर पडताना दिसत असल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष घटनास्थळाकडे वेधले गेले.
घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या बाणेर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले. इमारतीचा मजला उंचावर असल्याने आग विझविण्याचे काम आव्हानात्मक ठरले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरातील मंडळी बाहेर गेले असल्याने मोठी जीवितहानी टळली.
