लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू संपूर्ण परिवाराच्या जीवावर उठली…जे काही केले त्याने महाराष्ट्र हादरला

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू संपूर्ण परिवाराच्या जीवावर उठली…जे काही केले त्याने महाराष्ट्र हादरला
Share

जळगाव- थाटामाटात लग्न झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी नववधुने संपूर्ण कुटुंबाला विष देऊन घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी दोघींना बेड्या ठोकल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्याच्या पारोळा तालुक्यात समोर आला आहे.

या प्रकरणी गणेश पाटील यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सुमन सुभाष सहाणी आणि आरती सूर्यप्रकाश पटेल या दोघींच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वेल्हाणे येथील रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय वाल्मिक ताराचंद पाटील या तरुणाचे लग्न जुळत नव्हते. एका दलालामार्फत झारखंड किंवा छत्तीसगड भागातून अडीच लाख रुपयांची बोली लावून दोन मुलींना महाराष्ट्रात आणण्यात आले आणि दोघींपैकी सुमन सुभाष सहाणी हिच्याशी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी वाल्मिकचा विवाह गावातच पार पाडला.

लग्नाची गडबड अजून संपत नाही तोवरच नववधूच्या तिसऱ्याच दिवशी धक्कादायक कृत्य केले.९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास नववधू सुमन सहाणी आणि तिची साथीदार आरती सूर्यप्रकाश पटेल यांनी संगनमत करून फिर्यादी गणेश पाटील, त्यांचे वडील ताराचंद शांताराम पाटील आणि आई सरलाबाई पाटील यांना जेवणात उंदीर मारण्याचे विषारी औषध मिसळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबातील सर्वजण बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून, दोघींनी घरातील रोख रक्कम आणि इतर ऐवज घेऊन १० ऑक्टोबर रोजी सकाळी गावातून पळ काढला. जेवणानंतर काही वेळातच विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने ताराचंद पाटील आणि सरलाबाई पाटील यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

वेल्हाणे येथील पोलीस पाटलांनी या गंभीर घटनेची माहिती मिळताच तात्काळ पारोळा पोलिसांना सतर्क केले. माहिती समजताच बिट अंमलदार पोलीस हवालदार सुनील हाटकर, पोलीस शिपाई गवळी व पोलीस शिपाई शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. संशयित महिला धुळे जिल्ह्याच्या दिशेने पसार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा माग काढला.

गोपनीय माहितीच्या आधारे पाठलाग करत पोलिसांनी धुळे जिल्ह्यातील निमगूळ गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर या दोन्ही महिलांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. गणेश ताराचंद पाटील यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आंतरराज्यीय विवाहविषयक गुन्हेगारी टोळीचा मूळ सूत्रधार असलेल्या दलालाचा शोध पोलीस घेत असून, पुढील तपास पारोळा पोलीस करत आहेत.

Vedh News