अमरावतीमधून धक्कादायक घटना ; आयटी इंजिनीअरने आईला संपवले, पोलीस ठाण्यात दिली कबुली

अमरावती- अविवाहित असलेल्या 39 वर्षीय आयटी इंजिनिअर मुलानेच स्वतःच्या आईचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. हत्येनंतर आरोपी मुलगा आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन हत्येची कबुली दिली. या घटनेने अमरावती शहर हादरून गेले आहे.
रंजना कानफाडे (वय ६५, रा. गजानन प्लाझा, नवरासी रोड ) असे मृत आईचे नाव असून तुषार सतीश कानफाडे (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तुषार हा आयटी इंजिनियर असून तो अविवाहित होता. आयटी कंपनीत तो चांगल्या पगारावर देखील होता. वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे तो घरातूनच काम करीत असे. आई आणि मुलगा असे दोघेच घरात राहत होते.
आई आणि मुलामध्ये घरगुती कारणांवरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तुषारने संतापाच्या भरात आईचा गळा आवळून खून केला. आई आपल्याशी व्यवस्थित बोलत नाही, अशी तुषारची तक्रार असल्याचे समोर आले आहे.
आईचा खून केल्यानंतर तुषार तिथेच बसून राहिला. नंतर त्याने गाडगे नगर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. ‘मी माझ्या आईचा खून केला’, अशी कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी तुषारला अटक करण्यात आली. हत्येमागील नेमकी पार्श्वभूमी तपासली जात आहे.
तुषारचे वडील हयात नाहीत. त्याचा भाऊ मोर्शी तालुक्यातील मूळ गावी राहतो. घरात मुलगा आणि आई दोघेच राहत होते. तुषार काही दिवसांपासून घरूनच नोकरी करत होता. त्याचे वार्षिक पॅकेज तब्बल २० लाख असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून माय-लेकात खटके उडत होते. आई आपल्यापासून काही तरी लपवत आहे आणि चुकीच्या गोष्टी सांगत आहे, असा संशय तुषारच्या मनात बळावला होता. याच रागाच्या भरात शनिवारी त्याने टोकाचे पाऊल उचलले.






